तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा,
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा.
पाण्यात ओंजळीच्या आला चुकून मीन
चमकून हो तसाच गाण्यात अर्थ जावा.
शिंपीत पावसाळी सर्वत्र या लकेरी
यावा अनाम पक्षी, स्पर्शू मलाच यावा.
देता कुणी दुरून नक्षत्रसे इशारे
साराच आसमंत घननीळ होत जावा.
पेरुन जात वाळा अंगावरी कुणी जो,
शेल्यापरी कुसुंबी वाऱ्यावरी वहावा.
तारांवरी पडावा केव्हा चुकून हातः
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा.
तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा,
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा.
Thursday, April 12, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment