Thursday, April 12, 2007

जाईन दूर गावा

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा,
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा.

पाण्यात ओंजळीच्या आला चुकून मीन
चमकून हो तसाच गाण्यात अर्थ जावा.

शिंपीत पावसाळी सर्वत्र या लकेरी
यावा अनाम पक्षी, स्पर्शू मलाच यावा.

देता कुणी दुरून नक्षत्रसे इशारे
साराच आसमंत घननीळ होत जावा.

पेरुन जात वाळा अंगावरी कुणी जो,
शेल्यापरी कुसुंबी वाऱ्यावरी वहावा.

तारांवरी पडावा केव्हा चुकून हातः
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा.

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा,
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा.

Wednesday, April 4, 2007

नाही कशी म्हणू तुला!!

नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत
परी सारे हलक्याने आड येते रीत!
नाही कशी म्हणू तुला येते जरा थांब
परी हिरव्या वळणांनी जायचे ना लांब!!

नाही कशी म्हणू तुला माळ मला वेणी
परी नीट ओघळेल हासतील कोणी!
नाही कशी म्हणू तुला घेते तुझे नाव
परी नको अधरांचा मोडू सुमडाव!!

नाही कशी म्हणू तुला जरा लपू छपू
परी पाया खडे कांटे लागतात खुपू!
नाही कशी म्हणू तुला विडा रे दुपारी
परी थोरांच्या समोर घ्यायची सुपारी!!

लवलव करी पात

लवलव करी पात, डोळं नाही थार्‍याला!
एकटक पहावं कसं, लुकलूक तार्‍याला!!

चवचव गेली सारी, जोर नाही वार्‍याला!
सुटं सूटं झालं मन, धरु कसं पार्‍याला!!

कुणी कुणी नाही आलं, फडफड गं राव्याची!
रुणझूण हवा का ही, गाय उभी दाव्याची!!

तटतट करी चोळी, तुटतुटक गाठीची!
उंबर्‍याशी जागी आहे, पारुबाई साठीची!!

तू तेव्हा तशी

तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी
तू बहराच्या, बाहूंची!
तू ऐलराधा, तू पैल संध्या
चाफेकळी प्रेमाची!
तू नवी जुनी, तू कधी कुणी
खारीच्या गं डोळयांची!
तू हिरवी कच्ची, तू पोक्त सच्ची
तू खट्टी मिठ्ठी ओठांची!!

कुणाच्या खांदयावर कुणाचे ओझे

कुणाच्या खांदयावर कुणाचे ओझे

कशासाठी उतरावे तंबू ठोकून
कोण मेले कोणासाठी रक्त ओकून
जगतात येथे कुणी मनात कुजून
तरी कसे फुलतात गुलाब हे सारे

दीप सारे जाती येथे विरुन विझून
वृक्ष जाती अंधारात गोठून जळून
जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे

ये रे घना

ये रे घना, ये रे घना!
न्हाऊ घाल माझ्या मना!!

फुले माझी अळुमाळू, वारा बघे चुरगळू!
नको नको म्हणताना, गंध गेला रानावना!!

टाकुनिया घरदार नाचणार, नाचणार!
नको नको म्हणताना, मनमोर भर राना!!

नको नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू!
बोलावतो सोसाट्याचा, वारा मला रसपाना!!

ये रे घना, ये रे घना!
न्हाऊ घाल माझ्या मना!!

गेले दयायचे राहुनी

गेले दयायचे राहुनी, तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्या पास आता कळया, आणि थोडी ओली पाने

आलो होतो हासत मी, काही श्वासांसाठी फक्त
दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र सोशी रक्त

आता मनाचा दगड, घेतो कण्हत उशाला
होते कळयांचे निमार्ल्य, आणि पानांचा पाचोळा